महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवरून संसदेत गदारोळ

नवीदिल्ली: महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवरून संसदेत मोठा  गदारोळ झाला. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी उत्तरप्रदेश आणि केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. आर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सोमवारी  दुसरा दिवस आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षातील खासदारांनी महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरून गदारोळ घातला. लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. तर राज्यसभेत देखील या मुद्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. या दरम्यान चेंगराचेंगरी झाली होती यामध्ये अनेक भाविकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचा मुद्दा विरोधी पक्षातील सदस्यांनी आज  संसदेत उपस्थित केला, यावरून संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा सक्षागृहात प्रचंड गदारोळ झाला. दरम्यान राज्यसभेतील सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. महाकुंभ चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केली आणि उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध सभागृहातून सभात्याग केला. यावरून ANI शी बोलताना समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव म्हणतात, "प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शी म्हणतात की चेंगराचेंगरीत हजारो लोकांचा मृत्यू झाला, पण कुटुंबांना मृतदेह मिळत नाहीत, अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. आम्ही येथे नोटिसा दिल्या आहेत पण त्या फेटाळण्यात आल्या आहेत...". काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, "...आम्ही एक तासासाठी सभागृहातून बाहेर पडलो आहे. आम्ही पुन्हा जाऊन हा मुद्दा उपस्थित करू. आम्हाला फोन येत आहेत, लोक रडत आहेत, ते त्यांच्या कुटुंबियांना भेटू शकत नाहीत. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की ३० मृतांची यादी का जारी केली गेली नाही... आमच्या सूचना सतत नाकारल्या जात आहेत आणि त्याचे कारण देखील माहित नाही.