UPI सेवा ठप्प: पेटीएम, फोनपे आणि गुगल पे वापरकर्त्यांना मोठा फटका

शनिवारी दुपारी 1 वाजल्यापासून संपूर्ण देशभरात UPI (Unified Payments Interface) सेवा ठप्प झाली, ज्यामुळे पेटीएम, फोनपे, गुगल पे सारख्या लोकप्रिय अॅप्सचा वापर करणाऱ्यांना मोठा फटका बसला. यामुळे स्थानिक खरेदी, बिल पेमेंट्स तसेच पैशांच्या व्यवहारांमध्ये गोंधळ उडाला. सोशल मिडिया आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर यासंबंधी अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या. डाउनडिटेक्टर या तक्रारी नोंदवणाऱ्या संकेतस्थळावर एकाच वेळी 2,300 पेक्षा अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या. यामध्ये 81% लोकांना पेमेंट करताना अडचणीचा सामना करावा लागला, 17% लोकांना पैसे ट्रान्सफर करताना अडचणी आल्या, आणि 2% लोकांना खरेदी करताना समस्यांचा सामना करावा लागला. हा तांत्रिक बिघाड एकाच वेळी अनेक बँका आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर आढळल्याने, हे नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींचं कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. NPCI किंवा अन्य कोणत्याही अधिकृत युपीआय संस्थांकडून अद्याप या घटनेचे स्पष्ट कारण किंवा उत्तर मिळालेले नाही. या अडचणीमुळे नागरिकांना पर्यायी पेमेंट पद्धती वापरण्याचा सल्ला दिला जात आहे, आणि या समस्येच्या निराकरणासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत आहेत.