विद्यापीठ आणि कौशल्य विकास सोसायटीमध्ये सामंजस्य करार

सोलापूर: कौशल्य विकास, रोजगार व नावीन्यता विभाग, महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र
राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे विद्यापीठाच्या
संलग्न महाविद्यालयांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवले जातील. या
कराराच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित
करण्यात येणार आहेत. हे प्रशिक्षण उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले
जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक रोजगाराच्या संधी
उपलब्ध होतील. कराराच्या स्वाक्षरी समारंभास सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.
डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा,
कुलसचिव योगिनी घारे आणि कौशल्य विकास मंत्रालयाचे मुख्य कार्यकारी
अधिकारी नितीन पाटील उपस्थित होते. यावेळी सहायक आयुक्त संगीता खंदारे, कौशल्य विकास विभाग संचालक प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर, कायदा अधिकारी अॅड. जावेद खैरदी, अधिसभा सदस्य
चन्नवीर बंकुर, डॉ. वीरभद्र दंडे, उद्यम
फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुराणी, मयंक
चौहान, कौशल विकास सोसायटीचे दत्तात्रय देवळे, मिलिंद अहेर आणि मोहसीन तांबोळी यांची उपस्थिती होती. कुलगुरू प्रा. डॉ.
महानवर यांनी सांगितले की, हा करार विद्यार्थ्यांना
उद्योगस्नेही कौशल्ये प्रदान करेल आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीस चालना देईल.