अमित शहा आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; तटकरे निवासस्थानी स्नेहभोजनामुळे राजकीय हालचालींना वेग

मुंबई ११ एप्रिल:-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून
दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान
होणाऱ्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात
आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता पुण्यात आगमन झाल्यानंतर शहा यांचा मुक्काम तेथेच
होणार आहे. शनिवारी सकाळी ते रायगड किल्ला गाठणार असून, तेथे
राजमाता जिजाबाई व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर
सायंकाळी मुंबईतील विलेपार्ले येथे एका माध्यमसमूहाच्या कार्यक्रमात ते सहभागी
होतील. शनिवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
आणि अन्य नेत्यांशी बैठक होणार आहे. मात्र याआधीच रायगडचे खासदार सुनील तटकरे
यांच्या रोहा तालुक्यातील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी शहा उपस्थित राहणार आहेत,
ही बाब राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात आहे. पालकमंत्रीपदावरून
शिंदे गट अस्वस्थ रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच
तापला आहे. आदिती तटकरे यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे
यांनी दिल्ली दरबारी तक्रार केल्यानंतर ती २४ तासांत स्थगित करण्यात आली. अशा पार्श्वभूमीवर शहा यांनी खासदार तटकरे यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत
त्यांच्या निवासस्थानी जाण्याचे ठरवल्यामुळे, शिंदे गट व
स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्यात अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
तटकरे आपले राजकीय वजन वापरून मुलीच्या पालकमंत्रीपदाला पाठबळ देतील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत,
मात्र शिंदे आणि गोगावले उपस्थित राहणार का, याबाबत
चर्चेला उधाण आले आहे.