परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत उद्योगवर्धिनीचा गुरुवारी परिवार उत्सव कार्यक्रम
.jpeg)
संचार प्रतिनिधी
सोलापूर, दि. १४
उद्योगवर्धिनी संस्थेला २१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या
उपस्थितीत गुरुवारी (दि. १७) सकाळी १० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात परिवार उत्सव
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या
संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक भारतरत्न स्व. नानाजी देशमुख यांच्या हस्ते २४
वर्षांपूर्वी उद्योगवर्धिनी संस्थेचे नामकरण झाले. यानंतर तीन वर्षांनी
उद्योगवर्धिनी संस्थेची स्थापना झाली. मागील २४ वर्षांत हजारो महिलांनी विविध
संकटांवर मात करत समृद्ध आणि स्वाभिमानी आयुष्याचा प्रवास उद्योगवर्धिनी सोबत केला
आहे. उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून शेकडो महिलांना शिलाई, खाद्य पदार्थ, स्वयंपाक आदींच्या माध्यमातून रोजगार
मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यात उद्योगवर्धिनीला यश आले
आहे. यातून शेकडो उद्योजिका घडल्या आहेत. अशाच यशस्वी आणि कर्तृत्ववान महिलांची
यशोगाथा जाणून घेऊन त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी परमपूजनीय
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत सोलापुरात येणार आहेत. प्रख्यात लेखिका नयनबेन जोशी
यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी संपादित केलेल्या '
उद्योगवर्धिनी की सेवाव्रती' या पुस्तकाचे
प्रकाशन व उद्योगवर्धिनीच्या कार्यावर आधारित अखंड यात्रा माहितीपटाचे उद्घाटन
परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम
उद्योगवर्धिनीच्या निमंत्रित मान्यवरांसाठी असून त्यांना निमंत्रण प्रवेशिका
देण्यात आल्या आहेत, असे उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा
राजोपाध्ये यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस उद्योगवर्धीनीच्या अध्यक्षा
चंद्रिका चौहान, सचिवा मेधा राजोपाध्ये, मार्गदर्शक समितीचे राम रेड्डी, डॉ. सुहासिनी शहा,
वासुदेव बंग, डॉ. माधवी रायते, केतन वोरा, आनंद जोशी, धिरेन
गडा, उद्योगवर्धिनीच्या उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव, खजिनदार वर्षा विभुते, संचालिका ॲड. गीतांजली चौहान,
शांताबाई टाके, सुलोचना भाकरे, दिपाली देशपांडे तसेच उद्योगवर्धिनीच्या सेवाव्रती कार्यकर्त्या उपस्थित
होत्या.
१० हजार महिलांना मार्गदर्शन आणि ३५० उद्योजिका उद्योगवर्धिनीने
गेल्या २१ वर्षांमध्ये १० हजाराहून अधिक महिलांना संपर्क करून त्यांना व्यवसाय, रोजगार, समुपदेशनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले
आहे. आजवर उद्योगवर्धिनीने ३५० उद्योजिका घडविल्या असल्याची माहिती संस्थापिका
अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी याप्रसंगी दिली.