उद्धवसेनेला नाशिकमधून मोठा धक्का : माजी आमदार निर्मला गावित शिंदेसेनेत दाखल

नाशिक – राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पुन्हा
एकदा मोठा धक्का बसला आहे. इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला
गावित यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरे यांच्या
नेतृत्वाखालील सेनेला जोरदार हादरा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, ‘लाडकी बहीण’ योजना कदापि बंद होणार नाही. ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत महायुतीने
दिलेली आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी
टप्प्याटप्याने पूर्ण करू.",स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी
निवडणुकांवरही शिंदेंनी लक्ष केंद्रित केले. "गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक" या घोषणेसह त्यांनी कार्यकर्त्यांना
आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. उद्धवसेनेसाठी डबल झटका केवळ दोन दिवसांपूर्वी नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. आता निर्मला गावित यांच्या प्रवेशामुळे उद्धवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या ही आणखी एक मोठी धक्का मानली
जात आहे. गावित या इगतपुरी मतदारसंघातून दोन वेळा
आमदार राहिल्या असून, त्यांनी २०१९ मध्ये उद्धवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. गावित यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर नजर टाकल्यास, त्यांचे वडील माणिकराव गावित सलग ९ वेळा खासदार राहिले आहेत, हे विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या
पक्षप्रवेशासह १५०० महिला कार्यकर्त्यांनीही
शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला आहे. यामध्ये शालेय पोषण आघाडी समितीचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार आणि माजी उपाध्यक्षा नयना
गावित यांचाही समावेश आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडींना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महत्त्वाची
रणनीती मानली जात आहे.