साताऱ्यातील दोन व्यक्तींवर थायलंडमध्ये जर्मन तरुणीवरील बलात्काराचा आरोप

सातारा : साताऱ्यातील विजय दादासाहेब घोरपडे (वय 47) आणि राहुल बाळासाहेब भोईटे (वय 40) यांना थायलंड पोलिसांनी जर्मन तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ही घटना 14 मार्च रोजी थायलंडमधील रिन बीचवर फुल मून पार्टीदरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे. थायलंड पोलिसांच्या माहितीनुसार, 24 वर्षीय जर्मन तरुणी आपल्या मित्रासोबत या पार्टीला उपस्थित होती. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घोरपडे आणि भोईटे यांनी तिला बीचवरील एका खडकावर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर हे दोघे कोह फांगन जिल्ह्यातील एका बंगल्यावर गेले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोघांना संशयित म्हणून ओळखले. 15 मार्च रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र, पीडित तरुणी ओळख पटवू शकत नसल्याने त्यांना सोडण्यात आले. 16 मार्च रोजी तरुणी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा दोघांना चौकशीसाठी बोलावले, आणि यावेळी तिने त्यांची ओळख पटवली. चौकशीत विजय घोरपडे यांनी आरोप मान्य केल्याचे सांगितले जात आहे, तर राहुल भोईटे यांनी बलात्काराचा आरोप नाकारला असला तरी पीडितेला मिठी मारल्याचे व चुंबन घेतल्याचे कबूल केले आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पीडित तरुणी लवकरच जर्मनीला परतणार असून त्यापूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, थायलंड पोलिसांनी घोरपडे आणि भोईटे यांना स्थानिक तुरुंगात डांबले आहे.