मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक परिसरात काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेक जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक परिसरात शुक्रवारी अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन भीषण अपघात घडल्याने खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सलग झालेल्या अपघातांमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पहिला अपघात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ढेकू गावाजवळ, मुंबई मार्गिकेवर मिसिंग लिंक संपणाऱ्या ठिकाणी घडला. खंडाळा घाटातील तीव्र उतारावरून येणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव ट्रकने समोर असलेल्या दोन ट्रकना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात संजीव डांगे (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त ट्रकमध्ये रंगाचे साहित्य आणि पुट्टी भरलेली होती. अपघातानंतर हे साहित्य रस्त्यावर सांडल्याने दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. पहिल्या अपघातानंतर काही तासांतच मिसिंग लिंक परिसरातील एका बोगद्याजवळ दुसरा अपघात घडला. एका भरधाव बसने पुढे जाणाऱ्या तीन कारना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. बचाव पथकाने गॅस कटरच्या सहाय्याने गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेत ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन्ही अपघातांनंतर महामार्ग पोलीस, आयआरबी, खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली आणि रस्त्यावर सांडलेले साहित्य साफ करण्यात आले. त्यानंतर वाहतूक संथ गतीने पूर्ववत करण्यात आली.  दरम्यान, नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक मार्गामुळे प्रवास जलद झाला असला तरी अतिवेग, निष्काळजीपणा आणि घाटातील तांत्रिक बिघाड यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी वाहनचालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि वाहनांची नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.