तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा थेट तुळजाभवानी मंदिराशी संबंध; १३ पुजाऱ्यांची नावे आरोपींच्या यादीत

धाराशिव: तुळजापूरमधील ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठा गौप्यस्फोट झाला असून, आता या प्रकरणाचा थेट संबंध तुळजाभवानी मंदिराशी आला आहे. या
प्रकरणात मंदिरातील तब्बल १३ पुजाऱ्यांची नावे आरोपींच्या यादीत असल्याने राज्यभर
खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या पुजाऱ्यांपैकी काही जण राजकीय पक्षांचे
कार्यकर्ते असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून यादी मागवली
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अध्यक्षा आणि
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुठा यांनी पोलिसांकडून संबंधित आरोपी पुजाऱ्यांची
अधिकृत यादी मागवली आहे. मंदिराशी संबंधित व्यक्ती अशा प्रकरणात सहभागी असल्याने
जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे.
पुजारी मंडळाची भूमिका स्पष्ट
दरम्यान, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन
शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, "ज्यांची
नावं आल्या आहेत ते पुजारी देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंधित नाहीत. तुळजापूर हे
पुजाऱ्यांचं गाव आहे, त्यामुळे सर्व पुजाऱ्यांना एकाच
छायेखाली आणणं चुकीचं आहे."
ते पुढे म्हणाले की, "ड्रग्ज तस्करी
विरोधात आम्ही गेली तीन वर्षं आवाज उठवत आहोत," असा
दावा देखील त्यांनी केला.
३५ आरोपींपैकी २१ फरार
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण ३५
आरोपी असल्याचे समोर आले आहे. मात्र यापैकी २१ आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध
घेणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरत आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप चिघळले
या प्रकरणात राजकीय वातावरणही तापले आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर
गंभीर आरोप करत सांगितले की, "प्रकरणातील काही आरोपी
राणा पाटलांचे कार्यकर्ते आहेत."
दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस खासदार निंबाळकर यांचे
आरोपींसोबतचे फोटो व्हायरल करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.