भररस्त्यावर आदिवासी महिलेला प्रसूती; रोहिणी खडसेंचा राज्य सरकारवर संताप

मुक्ताईनगर (जळगाव)राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची दयनीय स्थिती पुन्हा एकदा उघड झाली आहे. चोपडा तालुक्यातील बोरमळी गावातील एका आदिवासी महिलेला वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्याने तिला भररस्त्यातच बाळाला जन्म द्यावा लागला. या धक्कादायक प्रकारावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावर सरकारवर थेट निशाणा साधला आहे. चार मंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्य सेवा ढासळलेली खडसे यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, “भारत जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे, पण इथे एका गरीब बहिणीला रस्त्यावर बाळंत व्हावं लागतंय. ही किती मोठी शोकांतिका आहे!” तसेच, “ही घटना अशा जिल्ह्यात घडली जिथे तब्बल चार मंत्री आहेत, तरी आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ही बाब अत्यंत लाजिरवाणी असून, राज्य सरकारने तात्काळ उत्तर द्यावं,” अशी मागणी त्यांनी केली. खोट्या प्रगतिशीलतेवर प्रश्नचिन्ह आजही जर माझ्या लाडक्या बहिणीला रस्त्यावर बाळंत व्हावं लागत असेल, तर ही प्रगत भारताच्या खोट्या जाहिरातीची पोलखोल आहे,” अशी बोचरी टीका खडसे यांनी केली. प्रशासनाने अद्याप या घटनेबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नसून, आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि संबंधित मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रोहिणी खडसे यांची पोस्ट म्हणते...
एकीकडे आपण जपानला मागे टाकत अर्थव्यवस्था वाढवतो म्हणतो, आणि दुसरीकडे आदिवासी महिला रस्त्यावर बाळंत होते. अजून किती दिवस असं होणार?”