छत्रपती संभाजीनगरमध्ये थरकाप! उद्योजकाच्या बंगल्यावर ६ कोटींचा सशस्त्र दरोडा
.jpeg)
छत्रपती संभाजीनगर :– बजाजनगर
परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका उद्योजकाच्या बंद बंगल्यावर बुधवारी
मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करत तब्बल ६ कोटींचा ऐवज लंपास केला आहे.
परदेशात गेलेल्या कुटुंबाच्या अनुपस्थितीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात
खळबळ उडाली आहे. संतोष राधाकिसन लड्डा यांची दिशा ऑटो कॉम्स नावाची कंपनी वाळूज
एमआयडीसीमध्ये आहे. ते आपल्या कुटुंबासह ७ मे रोजी अमेरिकेला गेले होते. बंगल्याची
देखभाल करण्यासाठी चालक संजय झळके यांना बंगल्यावर राहण्यास सांगितले होते. बुधवारी
मध्यरात्रीच्या सुमारास, झळके हे हॉलमध्ये झोपलेले असताना,
अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. झोपेतून जागे झालेल्या झळके
यांना पिस्तुलचा धाक दाखवत हातपाय बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी
बंगल्यातील कपाटं, लॉकर फोडून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असा सहा कोटी रुपयांचा ऐवज
चोरून नेला. पोलिस तपासात दरोडेखोर दोन तासांहून अधिक वेळ बंगल्यात असल्याचे
सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून
दरोडेखोरांचा शोध सुरू असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.