आठ तासांनतर रेल्वेसेवा पूर्ववत

सोलापूर, दि.24- सीना नदीच्या महापुरामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा अखेर आठ तासानंतर सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. लांबोटीजवळ सीना नदीच्या पुराची पातळी रेल्वे पुलापर्यंत आल्याने प्रशासनाने रेल्वेसेवा थांबवली होती. दुपारी बारा वाजता चेन्नई-मुंबई ही रेल्वे सीना नदीच्या पुलावरून मुंबईकडे धावली. त्यावेळी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील आणि त्यांचे अधिकारी स्वत: उपस्थित होते. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर विभागातून धावणार्‍या रेल्वे गाड्या मंगळवारी रात्री दहा वाजता विस्कळीत झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अलर्ट मोडवर येऊन तत्काळ निर्णय घेतला आणि दक्षिण भारताकडे जाणार्‍या अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या कुर्डूवाडी-मिरज आणि कुर्डूवाडीमार्गे लातूरकडे वळविल्या. स्वतः डीआरएम डॉ. मिश्रा यांनी मंगळवारी रात्री आपल्या टीमसह सीना नदीवरील रेल्वे पुलाची पाहणी केली. त्यानंतर मुंबईहून सोलापूरकडे येणार्‍या रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. सिध्देश्वर एक्स्प्रेस माढ्याच्या आऊटरला थांबविण्यात आली. या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 15 एसटी बसेसद्वारे बार्शीमार्गे सोलापुरात आणण्यात आले. प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सोलापूर विभागातील सोलापूर, लातूर, धाराशिव, कुर्डूवाडी, मोहोळ, पंढरपूर आणि माढा रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे. वृध्द व लहान मुलांसाठी वैद्यकीय सेवाही पुरवण्यात आली. तसेच खाण्या-पिण्याची सोय देखील करण्यात आली.  बुधवारी दुपारनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेत सोलापूर विभागातून धीम्या गतीने रेल्वे सोडण्यात आल्या. सिध्देश्वर एक्स्प्रेस रात्री एक वाजता मुंबईकडे रवाना झाली.  सोलापूर विभागातील वरिष्ठ अधिकारी कंट्रोल रूममधून पाऊस आणि पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तर काही अधिकारी प्रत्यक्ष रेल्वे पुलाच्या ठिकाणावरून निरीक्षण करीत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोलापूर विभागातून रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटाचे पैसे प्रवाशांना परत देण्यात आले.

12 तास खोळंबल्याने मनःस्ताप

मेडिकल इमर्जन्सीमुळे पुण्याला तातडीने जाणे आवश्यक होते. लातूरहून ट्रॅव्हल्स रद्द झाल्याने सोलापूरहून गाडी बुक केली. दोन गाड्या रद्द झाल्या. रात्री एकच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर आलो. रात्रभर एकही गाडी गेली नाही. सकाळची हुतात्मा एक्स्प्रेस रद्द झाल्याचे सांगण्यात आले. वंदे भारतचे दोनवेळा रिशेड्युल करण्यात आले. शेवटी एकच्या सुमारास वंदे भारत रद्द झाल्याचे सांगण्यात आले. सर्व गाड्या रद्द झाल्याने बारा तासांहून अधिकवेळ खूप मनःस्तापचे गेले.

डॉ. आदेश सोमवंशी, प्रवासी लातूर.

दिरंगाईमुळे प्रवाशांची कोंडी कार्यालयीन कामासाठी बसवकल्याणहून पुण्याला निघालो होतो. लांबोटी पुलाजवळ वाहतूक थांबवण्यात आली होती. सुमारे दोन किलोमीटर गाड्या थांबल्याने ट्रॅफिक जाम झाली होती. परत येणार्‍या वाहनाने सोलापूर रेल्वे स्टेशनला आलो. मात्र, रात्री दीड वाजल्यापासून एकही गाडी सोलापूर स्टेशनवरून पुढे गेली नाही. सकाळी सहा वाजता निघणारी वंदे भारत एक्स्प्रेस रद्द झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सुमारे एक वाजता सांगितले. लवकर जाहीर केले असल्यास परत बसवकल्याणला जाता आले असते.

-नीलेश बिराजदार- प्रवासी, बसव कल्याण