गणेश विसर्जनात दुर्दैवी घटना : महाराष्ट्रात नऊ जणांचा बुडून मृत्यू, १२ बेपत्ता

गणपती विसर्जन सोहळ्यात राज्यभरात काही ठिकाणी दुर्दैवी
घटना घडल्या आहेत. ठाणे, पुणे, नांदेड,
नाशिक, जळगाव, वाशिम,
पालघर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला असून
१२ जण बेपत्ता आहेत. सध्या बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.
पुणे जिल्हा
तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जण बुडाले. वाकी खुर्द येथे भामा
नदीत दोन जण, शेल पिंपळगाव येथे एक जण आणि खेड येथे एक ४५
वर्षीय पुरुष वाहून गेला. तसेच बिरवाडी येथे एक जण विहिरीत पडला. तीन जणांचे
मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
नांदेड जिल्हा
गंडेगाव येथे नदीत तीन जण वाहून गेले. यापैकी एकाला वाचवण्यात यश
आले असून, इतर दोघांसाठी शोध मोहीम सुरू आहे.
नाशिक जिल्हा
सिन्नर आणि कळवण येथे पाच जण वाहून गेले. यापैकी दोन मृतदेह सापडले
असून उर्वरितांचा शोध घेतला जात आहे.
ठाणे जिल्हा
शहापूर तालुक्यातील मुंडेवाडी येथे तीन जण भार्गवी नदीत बुडाले.
गणेश विसर्जन करून परतताना ही घटना घडली. मृतांमध्ये दत्ता लोटे, प्रतिप मुंडे आणि कुलदीप जकारे यांचा समावेश आहे.
पालघर जिल्हा
गणेश विसर्जनादरम्यान ओढ्यात वाहून गेलेल्या तीन जणांना रो-रो
बोटीच्या मदतीने वाचवण्यात आले.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार ११
दिवसांच्या गणेशोत्सवात एकूण १,९७,११४
गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये १.८१ लाख घरगुती मूर्ती, १०,१४८ सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती आणि ५,५९१ गौरी-हरतालिका मूर्तींचा समावेश आहे. यातील सर्वाधिक विसर्जन पाचव्या
दिवशी (४०,२३०) व सातव्या दिवशी (५९,७०४)
झाले.