विठुरायाच्या दर्शनापूर्वीच चंद्रभागेत बुडून तीन महिलांचा मृत्यू

संचार प्रतिनिधी

पंढरपूर, दि. 19-

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत स्नानास गेलेल्या तीन महिलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. यापैकी एका महिलेची ओळख अद्याप पटली नाही.

आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न झाला असला तरी अद्याप तीर्थक्षेत्र पंढरीत दैनंदिन हजारो भाविकांची गर्दी असून येणारा वारकरी दर्शनापूर्वी चंद्रभागा स्नानास जातो. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील संगीता संजय सपकाळ व सुनीता माधव सपकाळ या सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुंडलिक मंदिरासमोर स्नानास गेल्या होत्या. मात्र पाण्याचा वेग व खोलीचा अंदाज न आल्यामुळे बुडून त्या मृत झाल्या तर कासार घाटसमोर स्नानास गेलेली अनोळखी वयोवृद्ध महिला देखील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली. सदर महिलेची ओळख अद्याप पटली नसून ती अंदाजे 60 ते 65 वर्षाची आहे.

संगीता व सुनीता यांचे मृतदेह सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाळवंटातील आदिवासी कोळी बांधवांनी बाहेर काढून देण्यास मदत केली तर अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शोधण्यात यश आले. सध्या उजनी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात आला असून यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही खबरदारी घेण्यात येत नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.