दहशतवादामुळे पर्यटन उद्योगाला फटका; विमान भाड्यात ३०% पर्यंत कपात"

श्रीनगर एप्रिल २५, २०२५ :
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटनावर थेट परिणाम
होताना दिसतो आहे. या घटनेनंतर पर्यटक मोठ्या प्रमाणावर माघारी
परतत असून, दिल्ली व मुंबईहून श्रीनगरला जाणाऱ्या
फ्लाइट्सच्या भाड्यात तब्बल २० ते ३० टक्क्यांची घट झाली आहे, अशी माहिती गुगल फ्लाइट्स आणि भारतीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली
आहे.
भाडे घटण्यामागे कारण - पर्यटकांची घट
मिंटने दिलेल्या अहवालानुसार, २५ एप्रिल ते २५ मे दरम्यानच्या काळात श्रीनगरच्या विमान भाड्यांमध्ये दोन अंकी घसरण झाली आहे. दिल्ली-श्रीनगर मार्गासाठी ७ दिवसांसाठी सरासरी
भाडे ४,७२० ते ५,८५९ रुपये, तर ३० दिवसांच्या आगाऊ बुकिंगसाठी ६,६७० ते ८,६४० रुपये इतके भाडे आहे. पूर्वी हे भाडे ६,६०० ते ११,००० रुपये दरम्यान होते.
मुंबई-श्रीनगर मार्गावर देखील अशीच परिस्थिती
असून, सध्याचे ७ आणि १५ दिवसांच्या बुकिंगसाठी सरासरी भाडे ४,७७५ रुपये, तर ३० दिवसांपूर्वी बुकिंगसाठी ११, ८१० रुपये इतके आहे. या मार्गावरील सामान्य भाडे १०,५०० ते १७,५०० रुपये असते. सरकारचे हस्तक्षेप आणि विमान कंपन्यांची हालचाल हल्ल्यानंतर काही विमान कंपन्यांनी भाडेवाढ केली होती. याची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी तात्काळ हस्तक्षेप करत विमान कंपन्यांना भाडेवाढ टाळण्याचे निर्देश
दिले. इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेटने श्रीनगरसाठी अतिरिक्त फ्लाइट्स सुरू
केल्या आहेत. तसेच, बुकिंग रद्द किंवा वेळ बदलण्यासाठी शुल्कही माफ
करण्यात आले आहे.
पर्यटनावर दीर्घकालीन परिणाम?
ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (TAFI) चे अध्यक्ष अजय प्रकाश म्हणाले, “हल्ल्याचा दीर्घकालीन परिणाम काश्मीरच्या
पर्यटनावर होणार आहे. प्रवाशांची संख्या कमी झाल्यास, फेऱ्याही कमी होतील आणि इतर पर्यटन स्थळांना जाण्यासाठीचे भाडे वाढू
शकते,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.