तालुक्यात वाघ , बिबट्या , कोल्ह्याचा प्रवेश नि आता माकडाचाही सुरू झाला त्रास

बार्शी, दि. ७-

बार्शी तालुक्यातील कधी नव्हे ते प्राण्यांच्या वावरामुळे बार्शीकर आता पुरते वैतागले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण आधी बिबट्याने भीती निर्माण केली होती, आणि त्यात पुन्हा वाघाचा प्रवेश झाला. सर्व तालुका या दोन वन्य प्राण्यांमुळे जीव मुठीत घेऊन कामे करू लागला आहे.  चार पाच दिवसातून एकदा या दोन्ही वन्यप्राण्यांचा वावर कुठे ना कुठे दिसू लागला.  यात पुन्हा भर म्हणून उक्कडगावात एक माकड घरात घुसून अन्नधान्याची नासधूस करू लागले. यातच या माकडाने गावातील सहा कुत्र्यांना मारून टाकले. घरात माकड येईल या भीतीने ग्रामस्थ सतत घराचा दरवाजा लावून सावधपणे वागत आहेत.  आधीच वाघ आणि बिबट्यामुळे भयभीत झालेले गावकरी या माकडाच्या त्रासापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागले. विशेष म्हणजे हे कमी की काय म्हणून तालुक्यातील झरेगावात सुहास पोटभरे यांच्या शेतात कोल्ह्याचा प्रवेश झाला. कोल्हा आला. हा कोल्हा शिकारीच्या शोधात असताना पोटभरे यांच्या शेतातील विहिरीत पडला. या विहिरीतून कोल्ह्याला सुरक्षित बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात वान विभागाला अखेर यश आले. दरम्यान हे सुरू असतानाच तालुक्यातील घोळवेवाडी येथील आदित्य तोगे हे मोटार सायकलवरून येडशी - बार्शी रोडवरून गावाकडे येत असताना बार्शी एडशी रस्त्यावर दोन बिबट्यांनी  त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला. एकूणच सद्यस्थितीत या वन्यप्राण्यांच्या वावर व त्रासामुळे बार्शीकर आणि विशेष करून ग्रामीण भागातील ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहेत. बार्शी वन विभागासमोर हे आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे.