मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल; आंतरराष्ट्रीय विमानात स्फोटकांची माहिती, सुरक्षेत मोठी खळबळ

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीतीचे वातावरण पसरले आहे. विमानतळ अधिकाऱ्यांना एका संशयास्पद ईमेलद्वारे स्फोटकांच्या धमकीची माहिती मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. ईमेलमध्ये जपान, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया येथे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये स्फोटके ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर ही विमाने उड्डाण केल्यानंतर दर अर्ध्या तासाने एकामागून एक उडवली जातील, अशी थरकाप उडवणारी धमकी देणाऱ्याने दिली आहे.

धमकी देणाऱ्याने या धोक्यापासून वाचण्यासाठी आणि स्फोटके निष्क्रिय करण्यासाठी १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (USD) खंडणीची मागणी केली आहे. या ईमेलची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन, CISF, एयरलाइन कंपन्या आणि मुंबई पोलिसांनी तातडीने उच्चस्तरीय तपास सुरू केला आहे. संबंधित उड्डाणे, प्रवासी क्षेत्र, बॅगेज आणि इतर संपूर्ण परिसराची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, ईमेल पाठवणारा कोण आहे, तो कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागचा उद्देश काय आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलसह अनेक पथके तपासात गुंतली आहेत. प्राथमिक तपासात या धमकीमागे कोणताही विश्वसनीय आधार आढळला नसला तरी, सावधगिरी म्हणून सर्व सुरक्षा पातळी वाढवण्यात आली आहे. या घटनेमुळे विमानतळावर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रवाशांना अतिरिक्त तपासणीनंतरच प्रवेश दिला जात आहे. अधिकृतरीत्या कोणत्याही उड्डाणावर परिणाम झाल्याची माहिती मिळालेली नाही.