“चंद्रावर डाग असतील, पण मोदींवर नाही”; कंगना राणावत पुन्हा वादात

नवीदिल्ली: “पंतप्रधान मोदी हे सामान्य व्यक्ती नाहीत तर ते एक अवतार आहेत. असे विधान करून खळबळ उडवून देणारी अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत  आता  चंद्रावर डाग आहेत, पण पंतप्रधान मोदींवर एकही डाग नाही," या विधानांमुळे नव्याने चर्चेत आली आहे.  बॉलीवुड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत वादग्रस्त विधानासाठी ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. कंगनाने एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केले आहे. यावेळी कंगणाने चंद्रावर डाग आहेत, पण पंतप्रधान मोदींवर एकही डाग नाही, असे म्हंटले आहे. तसेच तिने काँग्रेसवर देखील सडकून टीका केली आहे. हिमाचल प्रदेशातील सुंदरनगरच्या जारोल विधानसभा क्षेत्रात कंगनाने एका सभेला संबोधित करताना म्हटले, “भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा सनातन, राष्ट्रवाद, वसुधैव कुटुंबकम यांचे पालन करते. जे आपण बऱ्याच काळापासून पाळत आलो आहोत. 2014 पूर्वी अनेक घोटाळे होत होते. 2जी घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा… पंतप्रधान मोदींवर एकही डाग नाही. चंद्रावर डाग असतात, त्यांच्यावर एकही डाग नाही.”  यावेळी कंगणाने हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर राज्याची दुरवस्था केल्याचा आरोपही केला. राज्यातील ‘समोसा’ चौकशीच्या वादावरून कंगनाने निशाणा साधला आहे. “संपूर्ण देशात पंतप्रधान मोदी आणि भगव्या रंगाची लाट आहे पण हिमाचल प्रदेशची स्थिती पाहून वाईट वाटतं. त्यांच्या एजन्सी समोशाची चौकशी करत आहेत.” पुढे ती म्हणाली, “जे काही चालले आहे, त्यामुळे आपल्याला लाज वाटते. तुम्ही जमिनीवर इतके कष्ट करता, आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेणे ही आपली जबाबदारी आहे. मी म्हणेन की ते एकप्रकारे लांडगे आहेत. आपल्याला आपले राज्य त्यांच्या पंजातून मुक्त करावे लागेल.” याशिवाय कंगनाने मोदींचा ‘अवतार’ म्हणूनही उल्लेख केला होता. “पंतप्रधान मोदी हे सामान्य व्यक्ती नाहीत तर ते एक अवतार आहेत. ते 2014 मध्ये पंतप्रधान झाले त्यावेळी तरुणांचा राजकारणाबाबत असलेला दृष्टीकोन बदलला. राजकारण म्हणजे दुर्भाग्य आहे अशीच माझंही 2014 पूर्वी मत होतं,” असे म्हणत तिने मोदींचे तोंडभरून कौतुक केले होते. दरम्यान, कंगनाच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.