राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात पुण्याच्या नेतृत्वात बदलांची चाहूल

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये मोठा राजकीय फेरबदल झाला असून, पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा राजीनामा अधिकृतपणे स्वीकारण्यात आला आहे. याबाबत माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी नैतिकतेचा आधार घेत आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना सुपूर्त केला होता. "पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला," असं स्पष्टीकरण मानकर यांनी दिलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, मानकरांच्या राजीनाम्याने पुण्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. आता पक्षाच्या नव्या शहराध्यक्षाच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत पुणे शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची नावे चर्चेत आली असल्याची माहिती मिळते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. पुढील चार दिवसांत नवीन शहराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.