'द वॉल' राहुल द्रविड यांच्या मातोश्री डॉ.पुष्पा द्रविड यांना कल्याण रत्न पुरस्कार प्रदान

बेंगळूरू : महिलांनी स्वतःची जबाबदारी ओळखून पुरुषांच्या बरोबरीने काम करायला हवे. स्त्री व पुरुष म्हणजे संसाररथाची दोन चाके असून, दोघांचे सहकार्य असेल तरच तो सुरळीतपणे पुढे जाऊ शकतो, असे प्रतिपादन क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्या मातोश्री डॉ. पुष्पा द्रविड यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या वतीने ‘चि. कार्तिक स्मरणार्थ मिलिंद उमाळकर पुरस्कृत’ कल्याण रत्न’ पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, "कौटुंबिक जबाबदारी सांभाळतानाच मी चित्र आणि शिल्पकलेचा व्यासंग जपला. दृढ निश्चय असेल, तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते." त्यांनी राहुल द्रविड यांच्या बालपणातील आठवणीही शेअर केल्या.

कार्यक्रमात प्रतिभा टेकाडे आणि नूतन शेटे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करणारी कविता सादर केली. तसेच दिपाली वझे यांनी रेखाटलेले राहुल द्रविड आणि पुष्पा द्रविड यांचे स्कूटरवरील व्यंगचित्र भेट दिले. कार्यक्रमाला कारामसापचे अध्यक्ष गुरय्या रे. स्वामी, कोषाध्यक्ष मिलिंद उमाळकर, कार्यवाह प्रभाकर सलगरे, बेंगळूरू विभागाच्या अध्यक्षा दिपाली वझे, गौरवाध्यक्ष राजेंद्र पडतुरे, उपाध्यक्ष डॉ. अनुराग लव्हेकर, चित्रकार डॉ. दीपक कन्नल आदी मान्यवर उपस्थित होते.