स्वातंत्र्याचा स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आपल्या शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबद्दल विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. या व्हिडिओच्या व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी स्टुडिओवर तोडफोड केली. या घटनेनंतर शिवसेनेच्या १० ते १५ कार्यकर्त्यांवर आणि स्वतः कुणाल कामरा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की, "स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. महाराष्ट्राच्या जनतेने २०२४ साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार, हे दाखवून दिलं आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार कोण आहे, हे जनतेनेच ठरवलं आहे. अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करणं चूक आहे." फडणवीस पुढे म्हणाले, "तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करा, पण जर कोणाचा अपमान करण्याचं काम कुणी करेल, तर ते सहन केलं जाणार नाही. कुणाल कामरा यांनी माफी मागितली पाहिजे. संविधानानुसार स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमणही होणार नाही." दरम्यान, शिवसैनिकांच्या तोडफोडीनंतर कुणाल कामराने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हातात भारतीय राज्यघटनेची प्रत धरून एक फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन दिलं आहे, "The Only Way Forward". यामधून त्यांनी संविधान हाच मार्ग असल्याचं सूचित केलं आहे.