छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे मजबुतीकरण १९ फेब्रुवारीपूर्वी होणार

सोलापूर, दि. १३-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मजबुतीकरण तसेच चौकाचे सुशोभीकरण करण्यासंदर्भात शुक्रवारी महापालिकेत बैठक पार पडली. या कामासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची ६३ लाख २९ हजार ४९४ इतक्या रकमेची निविदा काढण्यात आली व या कामाचा मक्ता निश्चित करण्यात आला आहे. या कामाबाबत चर्चा करण्यासाठी शहरातील प्रमुख शिवप्रेमी व विविध संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक महापालिकेत झाली.

अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, उपअभियंता किशोर सातपुते, कनिष्ठ अभियंता अभिजित बिराजदार व प्रशांत गुंड यावेळी उपस्थित होते. वास्तुविशारद शशिकांत चिंचोली यांनी पुतळा मजबुतीकरण व सुशोभीकरण संदर्भात उपस्थितांना माहिती दिली. उपस्थितांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत चर्चा करण्यात आली.

शिवरायांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यापूर्वी पुतळ्याचे मजबुतीकरण करणे अत्यावश्यक आहे. ते काम तांत्रिक पध्दतीने करावे लागणार आहे. त्यानंतर पुतळा सुशोभीकरणाचे काम करण्यात येईल. पुतळा मजबुतीकरण करण्याचे काम हे १९ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्याबाबत व तद्नंतर पुतळा सुशोभीकरणाचे काम चालू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.