कांद्याच्या दरात तीन हजाराची घसरण
.jpeg)
सोलापूर, दि. १७-
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ ते दहा दिवसांपूर्वी
प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दराने विकलेला कांदा सध्या तीन हजार रुपयांप्रमाणे
विक्री होत आहे. आठ दिवसांत तब्बल तीन हजार रुपयांची कांद्यातील घसरण पाहायला
मिळाले, एकीकडे एकरी उत्पादन घटले आहे तर दुसरीकडे दरात दिवसेंदिवस घसरण होत
असल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
सोलापूर बाजार समितीत मंगळवारी ४८ हजार ६७२ क्विंटल
कांद्याची आवक झाली होती. चांगल्या प्रतीच्या कांद्याला तीन हजार रुपयांपर्यंत दर
मिळाला तर सरासरी दर १८०० रुपये होता. यंदा सोलापूर जिल्ह्यात दरवषषिक्षा जास्त
खरीप कांद्याची लागवड झाली होती. परंतु अतिवृष्टी, प्रतिकूल हवामान, रोगराईमुळे
अनेक शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच सडून गेला. जून-जुलैमध्ये पेरणी केलेला खरीप
हंगामातील लाल कांदा अक्षरशः जागेवरच सडून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
आले. नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यात साठवून ठेवलेला उन्हाळी
कांदा दिवाळीपर्यंत बाजारात विक्रीसाठी येत होता. दरम्यानच्या काळात दर २ ते ५
हजार रुपयांपर्यंत होता. साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा बाजारातून संपल्यानंतर खरीप
हंगामातील लाल कांद्याची अपेक्षेप्रमाणे आवक होत नव्हती. त्यामुळे दर कडाडले होते.
सोलापूर बाजार समितीत डिसेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत
कांदा प्रतिक्विंटल ७ हजार रुपयांप्रमाणे विक्री होत होता. गेल्या काही
दिवसांपासून हैदराबाद, बंगळुरू, नाशिक,
अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढत आहे.
त्यामुळे दरात घसरण होत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. सोलापूर बाजार
समितीमधील कांदा प्रामुख्याने दक्षिण भारतातील हैदराबाद, बंगलुरूरू,
चेन्नई, तिरुवअनंतपूरम व कोलकाता, भुवनेश्वर आदी महानगरांत विक्रीसाठी जात आहे.