पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाली शपथ विधी; रेखा गुप्ता बनल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, विविध राज्यांचे
मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांनी आज गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला.
त्यांना दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी पद आणि गोपनियतेची शपथ
दिली. रेखा गुप्ता ह्या एकमेव महिला भाजप नेत्या आहेत; ज्यांना
मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री
बनल्या आहेत. तर सुषमा स्वराज यांच्यानंतर बनलेल्या भाजपच्या दुसऱ्या महिला
मुख्यमंत्री आहेत. यावेळी प्रवेश साहिब सिंह वर्मा, आशिष सूद,
मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रराज सिंह,
कपिल मिश्रा, पकंज कुमार सिंह यांनी मंत्रीपदी
शपथ घेतली. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी रामलीला मैदानावर
पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित
शहा, विविध केंद्रीय मंत्री आणि एनडीएशासित राज्यांचे
मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान, मध्य प्रदेशचे
मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा,
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, बिहारचे
उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, राजस्थानचे उपमुख्यमंत्री
प्रेमचंद बैरवा यांचीही उपस्थिती होती.