बाजार समितीच्या निवडणुकीने नेतेमंडळींना आणले जमिनीवर!
.jpeg)
(पंचाक्षरी स्वामी )
मंद्रूप,दि.२१ सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्वपक्षीय महाआघाडी रिंगणात उतरविल्याने अनेक नेत्यांना धडकी भरली आहे.काही नेतेमंडळींना आपल्या अस्तित्वाची जाणीव झाल्यामुळे गटबाजी आणि वैरत्व विसरून आज नेते एकमेकांची गळाभेट घेत आहेत. या विस्मयजनक घटनेने
जनता आश्चर्यचकित झाली आहे.राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना स्थानिक नेत्यांना एक करण्यात जमले नाही, मात्र,त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीने या नेत्यांना ताळयावर आणले आहे.आपण, एकत्र नाही आल्यास आपली राजकीय विकेट भविष्यात पडेल अशी भीतीही त्यांना होती.त्यामुळे नेते एकत्र आले आहेत.
एकत्र होण्यास भाग पडले आहे.कदाचित, ही नेते मंडळी जर सोलापूर जिल्हाच्या विकासासाठी एकत्र आली तर आज सोलापूर जिल्हाचा सर्वांगीण विकास झाला असता हे नाकारून चालणार नाही.
सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, श्रीशैल नरोळे आदी मंडळी बाजार समितीची निवडणूक आमदार सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांना सोबत घेऊन लढू यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना पुढाकार घ्यावा असे सांगितले होते.यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण महाआघाडी उभारत आहोत. यासंदर्भात पॅनल उभा करण्यासाठी माझे सर्व नेत्यांशी चर्चा सुरू आहे महाआघाडी निश्चितच होईल असे सांगितले होते.काही जागावाटपही ठरले होते.
मात्र, जागावाटपात शिवदारे यांना एक जागा कमी मिळाली, त्यामुळे ते नाराज होऊन आपला उमेदवारी अर्ज माघार घेत असताना कल्याणशेट्टी यांनी त्यांना रोखले होते.अखेर शिवदारे यांची समजूत काढण्यात आली असून ते प्रचारात सक्रिय झाले आहेत.दुसरीकडे, शेळके यांनी पॅनलच्या उभारण्यात आणि जागावाटप करताना आपल्याला विश्वासात घेत नसल्याने आपण उमेदवार घेत असल्याचे सांगितले होते आपण कल्याणशेट्टी यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली अशी खंत ते व्यक्त करीत आहेत. आमदार सुभाष देशमुख त्यांच्या पॅनलला त्यांनी पाठिंबा दिला आहे.कल्याणशेट्टी यांनी ज्यांच्याकडे सहकार क्षेत्रात ताकद आहे असे माने,हसापुरे,शिवदारे यांना सोबत घेऊन महाआघाडी रिंगणात उतरविले आहे.
सर्वपक्षीय महाआघाडी निर्माण करताना कल्याणशेट्टी यांनी आपल्याला विश्वासात घेतल्या नसल्यामुळे आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख कमालीचे नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला काही सूचना दिली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.आपण, ज्यांना राजकारणात आणले तोच व्यक्ती पक्षाचा जिल्हाचा सर्वेसर्वा होत आहे हे लक्षात आल्यावर आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपच्या कार्यकर्त्यासाठी आपण पॅनल उभारत असल्याचे सांगितले नेमके हीच बाब विजय देशमुख यांनीही हेरून आपल्याला मुख्यमंत्र्यांचा कोणताही निरोप नाही आपण आमदार सुभाष देशमुख यांच्या बरोबर असल्याचे सांगितले. दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख यांनी ज्यांना महाआघाडीत उमेदवारी नाकारले गेले अशा लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या समीकरणानुसार त्यांनी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट)जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी संचालक बाळासाहेब शेळके, माजी सभापती महादेव चाकोते,मनीष काळजे यांचा पाठिंबा घेऊन आपली ताकद वाढविली आहे.
राजकीय हिशेब चुकते केले...
बाळासाहेब शेळके यांनी २०१४ मध्ये दिलीप मानेच्या विरोधात विधानसभा लढवली.२०१९ मध्ये शेळके यांच्यामुळे मानेंना बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.सुरेश हसापुरे यांना कुंभारी जिल्हा परिषद गटात आणि कंदलगाव गणात शेळके यांनी अंतर्गत विरोध केला होता.यामुळे शेळके यांचा महाआघाडीतून पत्ता कट करण्यात आल्याची चर्चा आहे.बळीराम साठे हे नेहमीच मानेंना विरोध करतात त्यांचाही हिशेब चुकते करण्यात आले आहे.
कल्याणशेट्टी मंत्री होणार?
दोन देशमुख जागे झाले.. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.जिल्हाची सर्व राजकीय सूत्रे अप्रत्यक्षपणे फडणवीस यांनी त्यांच्याकडेच सोपविली आहेत.बाजार समितीच्या आडून त्यांच्या नेतृत्वावर फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले आहे.आगामी मंत्रीमंडळ विस्तारा कल्याणशेट्टी मंत्री होण्याची शक्यता आहे.कालचा युवक राजकारणात येऊन सहा वर्षातच जिल्ह्यातील राजकीय सूत्रे हलवितो आणि केंद्रबिंदू होतो.यांची खंत काहींना आहे.
कल्याणशेट्टी यांना २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी सुभाष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिफारस केली होती.
कल्याणशेट्टी हे आपले राजकीय गुरू सुभाष देशमुख यांना विसरणार नाहीत.कारण कल्याणशेट्टी हे संवेदनशील व्यक्ती आहेत.
कदाचित, त्यांना राज्यस्तरीय नेतृत्वाकडूनच स्वंतत्र पॅनल करण्याच्या सूचना दिल्या.शिवाय लोकसभा निवडणुकीत अपेक्षित आघाडी देण्यात दोन्ही देशमुखांना अपयश आले आहे.म्हणूनच त्यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली नाही.
फडणवीस यांच्याशी जुळवून घेण्यात दोन्ही देशमुखांना जमले नाही.दोन्ही देशमुखांचा स्वभाव फडणवीस यांना अडचणीचे ठरत आहेत.मितभाषी,युवा आमदार म्हणून
कल्याणशेट्टी यांनाच ताकद देण्याची भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे.आगामी काळात कल्याणशेट्टी मंत्री झाल्यास आश्चर्य वाटू नये इतकेच!