मराठवाड्यात नव्या समीकरणाची नांदी मराठा मतदारांना आपलेसे करण्याचा भाजपचा अजेंडा

लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा टिपेला होता. बीड जिल्हा या आंदोलनाचा मध्यबिंदू होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकही मोठी प्रचार सभा झाली नाही. उलटपक्षी फडणवीसांची सभाच नको असा पवित्रा महायुतीच्या अनेक उमेदवारांनी घेतला होता. जरांगे पाटील यांचे वाढते प्राबल्य आणि मराठा युवकांच्या मनात फडणवीस यांच्याविषयी निर्माण झालेली नकारात्मक भावना अगदी शिगेला पोहोचली होती. त्याच मराठवाड्यात आंदोलनाचे केंद्रस्थान असलेल्या बीड जिल्ह्यात भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाड्यातील पहिला जाहीर सत्कार घडवून आणत त्यांना नायकत्व बहाल केले आहे. जरांगे यांच्या पाठोपाठ सुरेश धस यांना मराठा युवकांचे सबंध मराठवाड्यातून मिळत असलेले समर्थन आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी फडणवीस यांचा केलेला जाहीर सत्कार भविष्यातील वेगळ्या राजकीय समीकरणाचे संकेत देणारा आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळच्या सहकार्‍यांवर आरोप झाल्यानंतर मराठा नेत्यांकडून मुंडे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी लावून धरली. धनंजय मुंडे महायुतीचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अडचणींमुळे ते वादाच्या भोवर्‍यात अडकले. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचा जंगी दौरा केला. राजकीय खंडणीखोरीच्या विरोधात परखड भाष्य केले. आपण सर्व मिळून नवीन बीड तयार करू, असेही जाहीर करून टाकले. फडणवीस यांची नवीन बीडची घोषणा धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडणारी आहे. मराठवाड्यात सध्या वंजारा समाज आणि मराठा समाजात मोठी दुही निर्माण झाली आहे. अशावेळी मराठा समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व करीत सुरेश धस यांनी जोरात रान मारले. त्यात जरांगे पाटीलही सहभागी होतेच. मात्र धस यांच्या आक्रमक भाषणामुळे मराठा समाजातील युवकांना हवा तसा आक्रमक नेता मिळाला. बीड जिल्ह्यातील राजकीय दहशत मराठा समाजाच्या जीवावर उठली आहे. त्यातूनच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली असल्याचा संताप सगळीकडून व्यक्त केला जात होता. आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या सगळ्या बाबींचे नेतृत्व सुरेश धस यांनी केले आणि देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असलेले सुरेश धस जरांगे पाटील यांच्यानंतर मराठा समाजातील युवकांचे सर्वात मोठे आकर्षण झाले. मराठवाड्यातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी केलेली नव्या बीडची घोषणा मराठवाड्यातील राजकीय समीकरणेच बदलवून टाकणारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संतप्त असलेला मराठा समाज नव्या बीडच्या घोषणेमुळे होणार्‍या धनंजय मुंडे यांच्या राजकीय कोंडीमुळे सुखावणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काचा मराठा मतदार भाजपकडे घेऊन जाण्यात सुरेश धस यांना यश मिळणार का? हेही नजीकच्या काळात पाहावे लागेल. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून बाजूला करण्यात यावे, यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढत आहे. भाजपने मंत्रिपदाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षावर सोपविला आहे. या परिस्थितीत भाजपने बीडमधील घडामोडींपासून स्वतःला दूर ठेवले आहे. तसेच सुरेश धस यांना मोकळे सोडून धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव निर्माण करण्याची खेळी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस हे सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक आहेत. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचे शिष्टमंडळ राजभवनावर गेले असता यातही धस यांचा सहभाग होता. सुरेस धस यांचा आक्रमकपणा कमी करण्यासाठी भाजपने हालचाल केली नसल्याचे दिसते. आष्टी येथे झालेल्या कार्यक्रमात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस यांचे कौतुक केले. सुरेश धस मतदारसंघाच्या विकासासाठी तत्पर असून ते आधुनिक भगीरथ आहेत, अशी उपमाही फडणवीस यांनी दिली. धस जेव्हा एखादा विषय हाती घेतात, तेव्हा तो तडीस नेऊनच थांबतात, असेही ते म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मराठा समाजात निर्माण झालेला रोष कमी करण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाज भाजपपासून दूर गेला होता. सुरेश धस यांच्या निमित्ताने मराठा समाजाला पुन्हा जवळ करण्याची रणनीती यानिमित्ताने सुरेश धस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली असल्याची चुणूक राजकीय जाणकारांना लागली नाही तरच नवल.

                 रवींद्र केसकर- मोबा. 9404619287