विधानसभा लढण्याचा प्रयोग फसला

तीन टर्म मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांनी नुकतीच गंगापूर- खुलताबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली. महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे असल्याने सतीश चव्हाण यांनी उमेदवारीसाठी थेट पक्षाशीच पंगा घेतला होता. मराठा आरक्षण व राज्यातील इतर विषय सोडवण्यात महायुतीला अपयश आल्याचा आरोप करत सतीश चव्हाण यांनी महायुतीला घरचा अहेर दिल होता. तेच चव्हाण आता पुन्हा अजित पवारांकडे जाणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. मराठा आरक्षण व राज्यातील इतर विषय सोडवण्यात महायुतीला अपयश आल्याचा आरोप करत सतीश चव्हाण यांनी महायुतीला घरचा अहेर दिल होता.

याची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तडकाफडकी सतीश चव्हाण यांच्यावर कारवाई करत त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. हे अपेक्षित असल्याने सतीश चव्हाण यांनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश आणि गंगापूरमधून विधानसभेची उमेदवारी निश्चित करून घेतली होती.

पक्षातून निलंबनाच्या कारवाईचा सोपस्कार पार पडल्यानंतर चव्हाण यांनी मोठ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या विषयाचा फायदा उचलत भाजपच्या प्रशांत बंब यांना पराभूत करण्याच्या उद्देशाने दोन्ही राष्ट्रवीदाने मिळून केलेली ही खेळी अखेर फसली अगदी शरद पवार यांनी चव्हाण यांच्यासाठी गंगापूरमध्ये येऊन जाहीरसभा घेत थेट प्रशांत बंब यांच्यावर हल्ला चढवला होता. बंब यांच्या जाहीरसभांमधून पंधरा वर्षात काय केले? असा जाब ठिकठिकाणी विचारला गेला.

बंब यांचा यंदा करेक्ट कार्यक्रम होणार, असे वातावरण मतदारसंघात तयार झाले होते. पण सलग तीन निवडणुका जिंकण्याचा अनुभव बंब यांच्या गाठीशी असल्याने त्यांनी सतीश चव्हाण आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे मनसुबे उधळून लावले.

बंब यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात चव्हाण यांचे सगळे डावपेच उलटवून लावले आणि सलग चौथा विजय मिळवत आपले मतदारसंघावरीलवर्चस्व दाखवून दिले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा दोन वर्षाचा कालवधी शिल्लक असताना मुळात चव्हाण यांनी गंगापूरमधुन विधानसभा निवडणूक लढण्याची नसती उठाठेव का केली? असा प्रश्न त्यांच्या पराभवानंतर अनेकांना पडला. विधानसभा निवडणूक लढवण्याचा डाव उलटल्यानंतर आणि निकालात राज्यात महायुती दोनशे पार जागा जिंकून निवडून आल्यामुळे आता पुढे काय? असा प्रश्न चव्हाण यांच्यासमोर होता. त्यामुळे चव्हाण आता पुन्हा अजित पवारांकडे परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अर्थात सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई त्यासाठी तत्काळ मागे घेतली जाऊ शकते. चव्हाण यांनीही आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्यासंदर्भात कार्यकत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चव्हाण यांच्यावर सहा वर्षांसाठी केलेली निलंबनाची कारवाई त्यांना दोन महिन्यात परत घेण्याची वेळ येते की काय? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

चव्हाण यांनी शरद पवारांचा पक्ष सोडून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यास मराठवाड्यात अजितदादांच्या पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे अजित पवारांनाही चव्हाण पक्षात असणे फायद्याचे ठरणार आहे. मात्र, अद्याप चव्हाण यांनी याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचे दिसत असले तरी चर्चा मात्र जोरात सुरू आहेत.