आता ठाण्यात भाजपला महापौर पद हवे...! मुंबईच्या दबावतंत्रावर डावखरेंनी डाव टाकला, अन्यथा...

मुंबईतील महापौरपदावरून राजकीय कलगीतुरा सुरू असतानाच आता ठाणे महानगरपालिकेतही सत्तावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. ठाण्यात भाजपला किमान दोन वर्षांसाठी महापौरपद मिळाले नाही, तर आम्ही सत्तेत सहभागी न होता थेट विरोधी बाकावर बसू,” असा खळबळजनक इशारा भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिला आहे. मुंबईतील राजकीय दबावतंत्राला प्रत्युत्तर म्हणून ठाण्यात भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. डावखरे म्हणाले, “शीळ ते वडवली या पट्ट्यात भाजपने अत्यंत प्रभावी काम केले आहे. आम्हाला मिळालेल्या जागांवर १०० टक्के स्ट्राईक रेट राखला आहे. आमची ताकद वाढली असून कार्यकर्त्यांची ठाम मागणी आहे की ठाण्याचा महापौर भाजपचाच असावा.” शिंदे सेनेसाठी अडचण वाढली सध्या ठाणे महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) बहुमतात आहे. मात्र सत्ता स्थिर ठेवण्यासाठी भाजपची साथ अत्यावश्यक आहे.
बहुमत तुमच्याकडे असले तरी आमचा सन्मान झाला पाहिजे. दोन वर्षांसाठी महापौरपद हा आमचा हक्क आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत डावखरेंनी युतीला थेट इशारा दिला आहे.

मुंबई राजकारणाचे पडसाद ठाण्यात?

मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याच्या हालचाली सुरू असताना, ठाण्यातही भाजपने आपला दावा ठामपणे मांडत शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात दबाव वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेना काय भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.