हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार; ५ जुलैला एकच मोर्चा

मुंबई – महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेना आणि मनसे आक्रमक झाले आहेत. त्रिभाषा सूत्राविरोधात ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – एकत्र येत असल्याची मोठी घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. २७ जून रोजी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले, “मायमराठीच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधू ५ जुलै रोजी एकत्र मोर्चा काढणार आहेत. काल (२६ जून) मला राज ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की मराठीसाठी दोन वेगळे मोर्चे निघणे योग्य नाही, म्हणून एकत्र मोर्चा काढावा.” सुरुवातीला मनसेचा मोर्चा ६ जुलैला आणि शिवसेनेचा मोर्चा ७ जुलैला नियोजित होता. मात्र, आषाढी एकदशीचा दिवस लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी ५ जुलै ही अंतिम तारीख ठरवली असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू कधी एकत्र येणार, यावर अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर मराठी भाषेच्या सन्मानासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. “मराठी ऐक्य दिसले पाहिजे,” असे उद्धव ठाकरे यांनीही म्हटल्याचे राऊत यांनी सांगितले. या संयुक्त मोर्चामुळे राज्यातील हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनाला आणखी जोर येणार आहे.