ठाकरे बंधू एकत्र या, दोन्ही पक्षही एकत्र करा – सुधीर मुनगंटीवारांचे मोठे विधान

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ऐतिहासिक क्षण येणार आहे. तब्बल १९ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एका मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील वरळीच्या डोम सभागृहात आयोजित विजयी मेळाव्यात हे दोन नेते माय मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार आहेत. या मेळाव्यापूर्वीच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठे विधान केले आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. दोन्ही भाऊ एकत्र यावेत आणि गरज असेल तर दोन्ही पक्ष एक करावेत.” त्यांनी पुढे सांगितले की, दोघे एकत्र आले तर काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली आहे की, आपण त्यांच्यासोबत जाणार नाही, असं मी ऐकलं आहे.” या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत की, शिवसेना आणि मनसे खरोखरच एकत्र येणार का?

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागचे कारण काय? मुख्य कारण माय मराठी भाषा. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला दोन्ही ठाकरे बंधूंनी कडाडून विरोध केला. राज्यभरातून मोठा विरोध होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आदेश रद्द केला. सुरुवातीला हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याचे नियोजन होते, परंतु सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर विजयी मेळावा घेण्याचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतला. आता या मेळाव्यातून ठाकरे बंधू कोणावर तोफ डागणार, आणि दोन्ही पक्षांच्या एकत्रित होण्याचा कोणता संकेत मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.