"दहशतवाद हाच खरा शत्रू" – मलालाचा शांततेचा संदेश भारत-पाकिस्तानला
.jpeg)
नवी दिल्ली (8 मे): भारतीय लष्कराने अलीकडेच 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि
पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईनंतर भारत
आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून, संपूर्ण जगाचे लक्ष या
घडामोडींवर केंद्रित आहे. या पार्श्वभूमीवर, नोबेल शांतता
पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई हिने आपल्या वक्तव्यातून
दहशतवादाचा तीव्र निषेध करत, शांती आणि संवादाचे
आवाहन केले आहे. मलालाने स्पष्टपणे सांगितले,
"आपण एकमेकांचे शत्रू नाही, आपला खरा
शत्रू अतिरेकीपणा, दहशतवाद आणि हिंसाचार आहे."
तिने आपल्या मुलाखतीत असेही म्हटले की भारत आणि पाकिस्तानने विभाजनाच्या
शक्तींविरुद्ध एकत्र यावे आणि दहशतवादाविरुद्ध लढा द्यावा. आंतरराष्ट्रीय
समुदायाच्या हस्तक्षेपाची गरज असल्याचे सांगत, मलालाने
म्हटले, "शांतता, संवाद आणि
सहकार्यच या प्रदेशाला स्थिरता आणि समृद्धीकडे नेऊ शकतात." व्यक्तिगत
अनुभवावर आधारित भावनिक आवाहन:
मलालाने तिच्या २०१२ मधील अनुभवाचा उल्लेख करत सांगितले की ती स्वतः
तालिबानच्या अतिरेकी हल्ल्याची बळी ठरली होती. त्यामुळे ती म्हणाली की
दहशतवादाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. "कोणताही व्यक्ती जन्मतः दहशतवादी
नसतो, समाज आणि परिस्थिती त्याला तशी दिशा देतात."
ट्विटरवरून आवाहन:
मलालाने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले: "द्वेष आणि हिंसा हे आपले खरे शत्रू आहेत, एकमेकांचे
नाहीत. मी भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांना तणाव कमी करण्याचे, नागरिकांचे – विशेषतः मुलांचे – रक्षण करण्याचे आणि फुटीरतावादी
शक्तींविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन करते."