राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी देणार महिन्याचे वेतन

हैदराबाद : राष्ट्रीय संरक्षण निधीत एक महिन्याचे वेतन जमा करण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री ए.रेवंथ रेड्डी यांनी केली. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते रेड्डी यांनी संबंधित निर्णय घेतला. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी आपल्या देशाची शूर सशस्त्र दले कार्यरत आहेत. देशाच्या सीमा आणि जनतेच्या रक्षणासाठी ते सक्रिय आहेत. त्यामुळे भारतीय नागरिक या नात्याने मी राष्ट्रीय संरक्षण निधीत माझ्या परीने योगदान देण्याचे ठरवले. संबंधित मोहिमेत माझ्या पक्षातील सहकाऱ्यांनी आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. विजयाचा निर्णायक क्षण येईपर्यंत सशस्त्र दलांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहू, असे आवाहन रेड्डी यांनी सोशल मीडियावरून केले. त्यांच्या आवाहनाला तेलंगणा कॉंग्रेसमधून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पक्षाच्या सर्व आमदारांनी महिन्याचे वेतन राष्ट्रीय संरक्षण निधीत जमा करण्याची तयारी दर्शवल्याचे समजते. आता त्यासंबंधीचा औपचारिक प्रस्ताव रेड्डी कॉंग्रेसच्या आमदारांपुढे मांडतील. तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याविषयीची अधिकृत घोषणा केली जाईल.