उन्हाळी सुटीतही शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार; ३० जूनपर्यंत प्रगतीसाठी विशेष मोहीम

सोलापूर : जिल्हा परिषद शाळांमध्ये यावर्षी उन्हाळी सुटीतही शिक्षकांना विद्यार्थ्यांचा
अभ्यास घ्यावा लागणार आहे. शिक्षण विभागाने दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी
विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक आठवड्याला
विद्यार्थ्यांची प्रगती तपासणे आणि ३० जूनपूर्वी विद्यार्थ्यांना भाषा व
संख्याज्ञानामध्ये सक्षम करणे बंधनकारक असेल. शाळांमध्ये सातत्याने अप्रगत विद्यार्थी पुढील वर्गात ढकलले जात असल्याचे
दिसून आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. याला आळा
घालण्यासाठी शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. यावर्षीच्या विशेष तपासणी
प्रक्रियेला मार्च महिन्यापासून सुरुवात झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययनस्तर निश्चित करून शिक्षकांना त्याबाबत सविस्तर
अहवाल सादर करावा लागेल. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अभ्यास नियोजन तयार
करण्यात येईल. शिक्षकांनी आठवड्याला एकदा विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊन त्यांच्या
प्रगतीचे मूल्यांकन करणे आवश्यक असेल. विशेषतः भाषा आणि संख्याज्ञान या दोन
विषयांवर भर दिला जाणार आहे. शिक्षण विभागाचे उद्दिष्ट ३० जूनपर्यंत १००
टक्के विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर सुधारण्याचे आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या
तयारीशिवाय पुढील वर्गात प्रवेश घेऊ नये, यासाठी शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे.
यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारली जाणार असल्याचा विश्वास
व्यक्त करण्यात येत आहे.