करमाळ्यात तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणास सुरुवात

करमाळा: करमाळा येथे जिल्हा परिषद, नगरपालिका, आश्रमशाळा व इतर खाजगी अशा सर्व
व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावी इयत्तेच्या शिक्षकांसाठी असणाऱ्या तालुकास्तरीय
शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. शहरातील लीड
स्कूल येथे पहिली ते पाचवी तर गुरुकूल पब्लिक स्कूल येथे सहावी ते बारावी
इयत्तांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. दोन्ही ठिकाणी मंगळवारी (दि.
११) प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला. लीड स्कूल येथे तालुक्यातील एकूण ७५४ शिक्षकांना
पाच टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातील सुरु झालेल्या पहिल्या टप्प्यात
एकूण दीडशे शिक्षकांना सहा सुलभकांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. तर
गुरुकूल पब्लिक स्कूल येथे एकूण ६४९ शिक्षकांना चार टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार
आहे. तेथे सुरु झालेल्या पहिल्या टप्प्यात दीडशे शिक्षकांना सहा सुलभक प्रशिक्षण
देत आहेत. सदर प्रशिक्षणाचा प्रत्येक टप्पा पाच दिवसांचा राहणार आहे. राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय स्तर व पायाभूत स्तर, क्षमता आधारित अध्ययन अध्यापन
प्रक्रिया, समग्र प्रगती पत्रक, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययन, अध्यापणात प्रत्यक्ष वापर हे या
प्रशिक्षणाचे विषय आहेत. डायटचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, जिल्हा समन्वयक सुभाष बुवा, गटशिक्षणधिकारी जयवंत नलवडे
यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण होत आहे. या प्रशिक्षणासाठी तालुका समन्वयक
म्हणून ए. टी. माने, डी. डी. जाधव तसेच रेवणनाथ आदलिंग हे काम पाहत आहेत.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी मिनिनाथ टकले, नितीन कदम, सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख
नियोजन करत आहेत. प्रशिक्षणाबाबत बोलताना विस्तार अधिकारी टकले यांनी, शासकीय, खाजगी अनुदानित शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक
स्तरावरील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे तालुका स्तर प्रशिक्षण दिले जात आहे. या
प्रशिक्षणातून शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रशिक्षणामुळे
शाळा गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होईल. अशी माहिती दिली.