शालेय विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू पालकांना रक्ताने लिहिलेले पत्र सापडले , शाळा प्रशासनावर पालकांचा संताप

विजयपूर. :- एका विद्यार्थ्याने रक्ताने
लिहिलेल्या पत्रात "आई-बाबा, शंभर वर्ष सुखाने
जगा... माझी आठवण काढू नका... मी सुखात आहे" असे लिहून संशयास्पदरीत्या मृत
अवस्थेत सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र, त्या
विद्यार्थ्याच्या पालकांनी हा खून असल्याचा आरोप करत शाळा प्रशासनाविरुद्ध संताप
व्यक्त केला आहे. दुसरीकडे, शाळा प्रशासनाने तो आत्महत्या
केल्याचे सांगितले आहे. पोलिस आता ही आत्महत्या आहे की खून, याचा
तपास करत आहेत. या प्रकरणाची मिळालेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे...
ही धक्कादायक घटना विजयपूर जिल्ह्यातील ताळिकोट शहरातील एका खासगी शाळेत घडली आहे. ताळिकोट येथील विनायक इंटरनॅशनल स्कूलच्या शेजारच्या मोकळ्या जमिनीतील झाडाखाली एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. मडिवाळप्पा चबनूर (वय 15) असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो सिंदगी तालुक्यातील बोरगी गावचा रहिवासी असून नववी इयत्तेत शिक्षण घेत होता. शाळा प्रशासनाने पोलिसांना मडिवाळप्पाने आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. परंतु, मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी हा खून असल्याचा आरोप करीत आहेत .मृत विद्यार्थ्याच्या बॅगेतील नोटबुकच्या एका पानावर रक्ताने लिहिलेलं पत्र सापडलं आहे. त्यात "आई-बाबा... शंभर वर्ष सुखाने जगा... माझी आठवण काढू नका... मी सुखात आहे" असे लिहिल्याचे आढळून आले आहे. या पत्रामुळे विद्यार्थ्याच्या मृत्यू संदर्भात संशय निर्माण झाले आहे या घटनेबाबत शाळा कर्मचाऱ्यांनी सकाळी 7 वाजता पालकांना गोंधळलेल्या स्वरूपात माहिती दिली, असे मृताच्या पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे.घटनास्थळी ताळिकोट पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणी ताळिकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी पालकांचा आक्रोश हृदयद्रावक होता.एकूणच, या विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत पालकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. शाळा प्रशासनाच्या दिलेल्या माहिती आणि रक्ताने लिहिलेल्या पत्रामुळे संशय अधिक गडद होत आहे. पोलीस तपासानंतरच या घटनेमागील खरे सत्य समोर येईल.