सोलापुरात राष्ट्रवादी नेत्याचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे सोलापूरमधील युवा नेता आणि सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय ३२) यांचा मृतदेह रविवारी रात्री त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या बंद कारमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. या संशयास्पद मृत्यूमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. रविवारी दुपारी ओंकार हजारे आपल्या घरासमोरील कारमध्ये बसले होते. मात्र दुपार उलटून गेल्यावरही ते बाहेर आले नाहीत, यामुळे घरच्यांना आणि शेजाऱ्यांना चिंता वाटू लागली. कारच्या काचेतून डोकावून पाहिल्यानंतर त्यांना ओंकार कारच्या सीटवर निपचित पडलेले दिसले. तत्काळ कारचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात हलवलं गेलं. मात्र, डॉक्टरांनी आताच त्यांचा मृत्यू झाला आहे, असं घोषित केलं. या घटनेनंतर सोलापूर पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमका निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. ओंकार हजारे हे केवळ सोलापूरमधील एक सक्रिय युवा नेते होते. पार्थ पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात त्यांची ओळख होती. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि राजकीय कामांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता.