सूर्य घर योजना पहिल्या टप्प्यात पाच हजार घरांवर सौर पॅनल बसविणार

सोलापूर:- 

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात आठ हजार 228 नागरिकांचे घरावर सौर पॅनल बसविण्यासाठी अर्ज प्राप्त झालेले असून त्यातील 8 हजार 179 अर्जांना मंजुरी देण्यात आलेली आहे तर 5 हजर 811 जणांच्या घरावर काम सुरू असून जवळपास अडीच हजार घरावर सौर पॅनल बसवण्यात आलेले आहेत. यामुळे विजेची बचत होऊन नागरिकांच्या वीजबिलात बचत होण्याबरोबरच पर्यावरणाचा र्‍हासही कमी होणार आहे. सौर ऊर्जा ही एक स्वच्छ, नूतन आणि पर्यावरणास अनुकूल ऊर्जा स्रोत आहे. भारतात सौर ऊर्जा वापरण्याची गरज वाढत आहे, आणि याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री सूर्य घर योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा प्रणालींचा प्रसार करणे आणि नागरिकांना या पर्यावरणीय उपक्रमात सहभागी करण्याचा आहे. या योजनेत सहभागासाठी अर्जदाराकडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. यामुळे ही योजना घरगुती वापरासाठीच आहे. ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या छतावर सौर पॅनेल बसवण्याची सुविधा मिळते. घराच्या छतावर सोलर रूफटॉप सिस्टम बसवण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. यामुळे सौर पॅनेल प्रभावीपणे कार्य करू शकतात आणि ऊर्जा उत्पादनात वाढ होणार आहे. अर्जदाराकडे वैध विद्युत कनेक्शन असावे लागेल, कारण योजनेचा फायदा घेण्यासाठी विद्युत कनेक्शनची गरज असते.  सूर्य घर योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रणालीच्या क्षमतेवर आधारित सबसिडीची मदत दिली जाते. योजनेत तीन प्रमुख श्रेणी आहेत. 0 ते 150 युनिटपर्यंत सौर ऊर्जा प्रणाली क्षमतेसाठी अनुदान 30 हजार ते 60 हजार रुपये, 150 ते 300 युनिटसाठी 60 हजार ते 78 हजार रुपयाचे अनुदान, 300 पेक्षा जास्त युनिटसाठी 78 हजाराचे अनुदान मिळणार आहे. या अनुदानामुळे नागरिकांना सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे दीर्घकालीन ऊर्जा खर्चात बचत होणार आहे. सूर्य घर योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा यासाठी जिल्हा प्रशासन व वीज वितरण कंपनी मार्फत नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. सौर ऊर्जा प्रणालींचा वापर केल्याने फक्त आर्थिक फायदे होतात असे नाही, तर हे पर्यावरणासाठीसुद्धा उपयुक्त आहे. सौर ऊर्जेचा वापर केल्याने पारंपरिक ऊर्जा स्रोतांवर अवलंबित्व कमी होते आणि कार्बन उत्सर्जनातही घट होते.

 चौकट- सूर्य घर योजना एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. योग्य पात्रता आणि अनुदानाच्या माध्यमातून ही योजना आपल्या घराच्या छतावर राबविण्यात येते. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होणे आणि सौर ऊर्जा वापरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेत सहभाग घेऊन आपल्या घरावर सौर पॅनल बसवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे