सांगलीतील युवा कंत्राटदाराची आत्महत्या — 89 हजार कोटींच्या थकित बिलांनी राज्यात खळबळ

सांगली :-
सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या हर्षल पाटील या सरकारी कंत्राटदाराने 1.4 कोटी रुपयांचे थकित बिले वेळेवर न मिळाल्याने आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

हर्षल पाटील, वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील रहिवासी व अभियंता, गेल्या काही महिन्यांपासून शासनाच्या दुर्लक्षामुळे तणावात होते. त्यांनी केलेल्या कामांचे बिल वेळेवर मिळाले नसल्यामुळे त्यांनी ६५ लाख रुपयांचे कर्ज उचलले होते, आणि तेही फेडता आले नाही. शेवटी त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद गट) यांनी सांगितले, "ही आत्महत्या नव्हे, तर सरकारने केला खून आहे. सरकारकडून रोजगाराच्या खोट्या आश्वासनांनी युवकांची स्वप्ने उद्ध्वस्त होत आहेत." काँग्रेसनेही सरकारवर जोरदार टीका केली. “एक मेहनती उद्योजक फडणवीस सरकारच्या फसव्या वचनांना बळी पडला,” असे म्हणत काँग्रेसने राज्य सरकारच्या विकास’ नव्हे, तर ‘विनाश’ धोरणावर घणाघात केला आहे. खासदार सुप्रिया सुळे (शरद पवार गट) म्हणाल्या, "शासनाच्या धोरणामुळे केवळ शेतकरीच नाही, तर व्यावसायिकही आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. हर्षल यांच्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी आपले आयुष्य घडवण्यासाठी उचललेला प्रयत्न शासनाच्या उदासीनतेमुळे अपयशी ठरला." जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ योजनेच्या माध्यमातून हर्षल पाटील यांनी संपूर्ण काम पूर्ण केले होते. मात्र शासनाकडे निधीच उपलब्ध नसल्यामुळे त्यांची बिले वर्षभर थकली होती. केंद्र सरकारने सुद्धा निधी न देण्याचे कळवले होते.