सुदानमध्ये भीषण नरसंहार; अल-फशीर शहरात ड्रोन आणि तोफखान्यांच्या हल्ल्यात ६० जण ठार
खार्टूम | 11 ऑक्टोबर २०२५
—
सुदानमधील अल-फशीर शहरात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी
पॅरामिलिटरी फोर्स (RSF) ने केलेल्या ड्रोन आणि
तोफखान्यांच्या हल्ल्यात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांमध्ये
महिलांपासून लहान मुलांपर्यंत अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, नागरिकांनी आश्रय घेतलेल्या एका ठिकाणाला
थेट टार्गेट करण्यात आलं. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओंमध्ये
इमारतींचं मोठं नुकसान, जळालेलं फर्निचर आणि ढिगाऱ्याखाली
अडकलेले लोक दिसत आहेत. सॅटेलाइट फोटो आणि स्थानिक व्हिडिओंच्या पडताळणीवरून या
हल्ल्यांची पुष्टी झाली आहे. अल-फशीर शहर हे दारफुर प्रदेशातील सैन्याच्या
नियंत्रणाखालील शेवटचं मोठं ठिकाण आहे. RSF दलाने हे शहर ताब्यात घेण्यासाठी वेढा घातला असून, त्यामुळे अन्नटंचाई, रोगराई आणि उपासमारचं संकट
वाढलं आहे. ड्रोन आणि तोफखान्यांचे हल्ले रुग्णालये, मशिदी
आणि आश्रयस्थानांवर केंद्रित आहेत. अल-फशीर रेझिस्टन्स कमिटीने एका निवेदनात म्हटलं आहे की —
“लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत, मुलं, महिला आणि वृद्ध जिवंत जळाले आहेत. आश्रयस्थानांवर दोन ड्रोन हल्ले आणि आठ
तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. हा एक क्रूर नरसंहार आहे.” स्थानिक रहिवाशांनी
सांगितले की, त्यांनी संरक्षणासाठी त्यांच्या घरांखाली बंकर
बांधले होते. तरीही अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हिंसाचार, उपासमार आणि आजारांमुळे शहरात दररोज ३० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू होत
असल्याची माहितीही समोर आली आहे.