‘आकाश गंगा’ मोहिमेचा यशस्वी पराक्रम; शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतीच्या तयारीत
.jpeg)
मुंबई : भारताच्या अंतराळ मोहिमेत एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला
आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय म्हणून ग्रुप कॅप्टन
शुभांशू शुक्ला हे १४ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार आहेत. शुक्ला आणि इतर तीन क्रू
मेंबर्सनी २५ जूनला फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण केले होते आणि
२६ जून रोजी अंतराळ स्थानकावर पोहोचले. १४ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी
४.३५ वाजता ते ISS वरून बाहेर पडणार आहेत.
यानंतर, ड्रॅगन अंतराळयान भारतीय वेळेनुसार
दुपारी ४:३० वाजता पृथक्करण करून अमेरिकेच्या कॅलिफोर्निया किनाऱ्यावर उतरणार आहे.
या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांनी ७ मायक्रोग्रॅव्हिटी प्रयोग केले असून, त्यातील ४ यशस्वी ठरले आहेत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात मानवी आरोग्य आणि
वनस्पतींची वाढ यावर त्यांच्या प्रयोगामुळे महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. ही
मोहीम भारत, पोलंड आणि हंगेरी या देशांचा पहिला सरकारी सहभाग
असलेली खासगी मोहीम ठरली आहे. ISRO ने या प्रवासासाठी सुमारे
५५० कोटी रुपये दिले असून हा अनुभव गगनयान मिशनसाठी उपयुक्त ठरणार आहे. पृथ्वीवर
परतल्यानंतर शुक्ला आणि क्रू मेंबर्सना ७ दिवसांचा पुनर्वसन कार्यक्रम करावा
लागेल. त्यांच्या कार्यामुळे तरुण वैज्ञानिक आणि नव्या पिढीला मोठी प्रेरणा मिळेल,
असे इस्रोने म्हटले आहे.