अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता अनुदान बंद

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या अपात्र महिलांवर सरकारने करडी नजर ठेवली आहे. योजनेनुसार चारचाकी असलेल्या आणि एकापेक्षा जास्त शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांची प्राथमिक यादी तयार झाली असून, आता पुढच्या टप्प्यात वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने महिलांसाठी ही योजना सुरू केली होती. अवघ्या दोन महिन्यांत राज्यातून दोन कोटींहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याने सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण आला. यामुळे इतर योजनांचे निधी वळवावे लागले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकार आता योजनेतील आधार-पॅन लिंक लाभार्थ्यांची आयकर विभागाच्या माध्यमातून पडताळणी करत आहे. आतापर्यंत १२ लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यामध्ये शेतकरी सन्मान निधी मिळवणाऱ्या महिलांचाही समावेश आहे.  सरकारने आता थेट राज्यस्तरावरून उत्पन्नाचा तपशील मिळवून अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांचा लाभ बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. या योजनेत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. मात्र, या उत्पन्नाची पडताळणी अद्याप पूर्णपणे झालेली नाही.