संगमेश्वर महाविद्यालयातील मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांची हिराचंद वाचनालयास अभ्यास भेट

सोलापूर : दि. १५ /२/२०२५.

संगमेश्वर महाविद्यालयातील बी.ए. भाग दोन मधील मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रीय प्रकल्प अंतर्गत सोलापूर मधील नामांकित वाचनालय असलेल्या श्री. हिराचंद नेमचंद वाचनालयास क्षेत्रीय भेट दिली. मराठी भाषा व साहित्य व्यवहारांमध्ये ग्रंथालयाची उपयोगिता अत्यंत महत्त्वाचे असते. विविध प्रकारची पुस्तके, मासिके, कोश व दुर्मीळ वृत्तपत्रांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना संशोधन करता येते. भाषा व साहित्याच्या संशोधनाची सर्व संदर्भ साधने ग्रंथालयातून मिळतात. मात्र त्यासाठी प्रत्यक्ष ग्रंथालयात जाणे, तेथील ग्रंथ पाहणे, त्याच्या नोंदी करणे अशा गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. विद्यार्थ्यांना संशोधनाकडे घेऊन जाण्यासाठी ग्रंथालयीन भेट हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अशा उपक्रमांना केंद्रवर्ती स्थान देत असून त्या अंतर्गतच क्षेत्रीय प्रकल्प हा भाग अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. यातून विद्यार्थी वर्गाच्या चार भिंतीबाहेर जाऊन अभ्यास करेल, समाजाचे निरीक्षण करेल आणि यातूनच त्याला समाजभिमुख संशोधन करता येईल या भूमिकेतूनच क्षेत्रीय प्रकल्प हा विषय महत्त्वाचा ठरणारा आहे. संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने क्षेत्रीय प्रकल्पातंर्गत विद्यार्थ्यांनी हिराचंद वाचनालयात भेट दिली. तेथील अनेक प्रकारच्या ग्रंथांची माहिती घेतली. त्यांचे आकलन केले. विविध मासिके, दिवाळी अंक वृत्तपत्रे अशी दुर्मीळ साधने अभ्यासली. यासाठी त्यांना ग्रंथालयातील श्री. मोरे यांनी मार्गदर्शन केले.  इतर सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील कार्याची माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रंथालयामधील मराठी भाषा व साहित्य व्यवहार समजून आला. या क्षेत्रीय भेटीमध्ये गायत्री मेट्रेप्रज्वला पारखे, साक्षी करकंटी, प्राजक्ता वाले, मिनाक्षी बनसोडे, शिवलीला बनसोडे, गुरुनाथ टेंगळे, स्वप्निल माळी, यश कन्नूरकर, ओबलेश अत्तरगी, बुद्धभूषण चिंचोळीकर, सतीश बिराजदार व सुरज माळी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या क्षेत्र भेटीसाठी प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा व मराठी विभागप्रमुख व उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांचे प्रोत्साहन तर प्रा. सागर सुरवसे, प्रा. रेश्मा सुर्वे यांचे सहकार्य लाभले. या क्षेत्र भेटीचे समन्वयक म्हणून डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.