पास घरी राहिल्याने सातवीतील विद्यार्थ्याला एसटी बसमधून थेट महामार्गावर उतरवले; मंगळवेढ्यात संताप

काका, पास घरी राहिला आहे… माझ्या पप्पांना फोन करा, ते पैसे देतील,” अशी कळकळीची विनंती करत असलेल्या सातवीतील चिमुकल्याला एसटी बसमधून थेट महामार्गावर उतरवण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी मंगळवेढा तालुक्यात घडली. या प्रकारामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील प्रथमेश राहुल पाटील हा विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला एसटीने ये-जा करतो. शनिवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता तो सोलापूर–मंगळवेढा एसटी बसने प्रवास करत होता. तिकीट तपासणीदरम्यान त्याला आपला प्रवास पास घरी राहिल्याचे लक्षात आले. प्रथमेशने तत्काळ वाहकाला आपल्या वडिलांना फोन करण्याची विनंती केली. मात्र, वाहकाने कोणतेही ऐकून न घेता बस थांबवून त्याला थेट महामार्गावर उतरवले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

डोळ्यांत पाणी, मनात भीती

अचानक महामार्गावर उतरवण्यात आल्याने प्रथमेश गोंधळून गेला. डोळ्यांत पाणी, मनात भीती आणि आजूबाजूला वेगाने धावणारी वाहने — अशा अवस्थेत तो रस्त्याच्या कडेला उभा राहिला. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्याला मदत केली आणि सुरक्षितपणे घरी पोहोचवले. घरी पोहोचल्यानंतर प्रथमेशने घडलेला प्रकार सांगताच कुटुंबीय हादरून गेले. या घटनेनंतर पालक राहुल पाटील यांनी संबंधित एसटी वाहकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एसटी प्रशासनाची प्रतिक्रिया

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंगळवेढा आगाराचे व्यवस्थापक संजय भोसले यांनी सांगितले, “घटनेबाबत माहिती घेतली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास संबंधितावर नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल.” या घटनेमुळे एसटीतील प्रवासी सुरक्षिततेचा आणि वाहकांच्या वर्तणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.