महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी – उदयनराजे यांचे अमित शहा यांना साकडे

नवी दिल्ली -
महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. त्यांनी विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या नावाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींवर १० वर्षे सश्रम कारावास आणि जबर दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा करण्याचे आवाहन केले. 
उदयनराजे यांनी नमूद केले की, सोलापूर आणि कोरटकर येथे महापुरुषांविषयी संतापजनक वक्तव्य करण्यात आले होते, ज्यामुळे राज्यभरात रोष पसरला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी त्यांनी मागणी केली.

शिवाजी महाराजांचा आदर्श आणि ऐतिहासिक महत्त्व

उदयनराजे भोसले म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा आदर्श ठेवत स्वराज्याची स्थापना केली. मात्र काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडून अश्लाघ्य वक्तव्ये केली जातात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींना मकोका किंवा टाडा अंतर्गत अटक करून अजामिनपात्र गुन्हा दाखल करावा." इतिहासाचे संरक्षण आणि राष्ट्रीय स्मारकाची मागणी उदयनराजे यांनी मराठा साम्राज्याच्या अधिकृत इतिहासाच्या प्रकाशनाची मागणी केली. त्यांनी सुचवले की, चित्रपट, वेब सिरीज किंवा मालिकांमध्ये ऐतिहासिक संदर्भ सादर करण्यापूर्वी इतिहासकार, संशोधक आणि तज्ज्ञांची समिती स्थापन केली जावी. तसेच दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय, कर्नाटकातील शहाजीराजे भोसले यांची समाधी संरक्षित क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली. तसेच मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणीच्या कामाला गती देण्याची मागणी केली.