लातूरमध्ये छावा संघटना व राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये तुफान राडा; सूरज चव्हाण यांची जाहीर माफी

लातूर: छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी लातूरमध्ये खास कार्यक्रमादरम्यान भेट दिली होती. निवेदन देताना त्यांनी पत्ते उधळत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांना मारहाण केली, आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. खुद्द सूरज चव्हाण यांनी फेसबुकवर पोस्ट करत माफी मागितली आहे. त्यांनी नमूद केले की, “मारहाणीचा प्रकार घडायला नको होता. मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.” सूरज चव्हाण यांनी पुढे म्हंटले की, “मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्याला मारहाण करणे हे माझ्या स्वभावात नाही. मी लवकरच विजय पाटलांची भेट घेऊन गैरसमज दूर करेन.” दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे. रविवारी घडलेल्या या प्रकारामुळे लातूरमध्ये छावाच्या कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली आहे.