शिवराज पाटील चाकूरकर अनंतात विलीन

लातूर: सहा दशकाहून अधिक  काळ व्रतस्थ लोकसेवेचा  ठसा उमटविणारे  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर लातूर शहराजवळील वरवंटी येथील शेतात शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.   विविध मठाधीशांनी वीरशैव लिंगायत परंपरेप्रमाणे त्यांच्यावर मंत्रोपचारात अंतिम संस्कार केले. यावेळी पोलीस दलाच्यावतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार अशोक चव्हाण, खासदार रजनीताई पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा,श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा दैनिक संचारचे संपादक धर्मराज काडादी , कर्नाटकचे मंत्री ईश्वर खंड्रे, यशवंतराव गौडा,माजी आमदार विश्वनाथ चाकोते  यांच्यासह अनेक माजी केंद्रीय मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे लातुरातील ‘देवघर’ निवासस्थानी निधन झाले. शनिवारी सकाळी 10 वाजता ‘देवघर’ निवासस्थानाहून चाकूरकर यांची अंतिम यात्रा निघाली. यात हजारो चाहते सहभागी झाले. शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. व्यापार्‍यांनी आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवली होती. त्यामुळे बहुतांश रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. अंत्ययात्रा वरवंटी येथील शेतात पोहचल्यानंतर अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केला. यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर पोलिसांनी तिरंगा ध्वज देऊन आणि हवेत बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रध्दांजली वाहिली.