पुरीत जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; ६०० जण जखमी

पुरी (ओडिशा) – ओडिशातील प्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात होताच
दुर्दैवी घटना घडली आहे. प्रचंड गर्दीमुळे रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली असून
सुमारे 600 भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भगवान बलभद्र यांच्या तलध्वज रथाला
एका वळणावर ओढण्यात अडचण आली. रथ थांबल्यामुळे हजारो भाविक एकाच ठिकाणी जमा झाले
आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दमट हवेमुळे अनेक भाविकांना श्वास घेणे कठीण
झाले व काही जण बेशुद्ध पडले. ओडिशाचे मंत्री मुकेश महालिंग यांनी
सांगितले, “रथ थांबल्यानंतर मोठा गोंधळ झाला. दमट हवेमुळे लोकांना
गुदमरल्यासारखे वाटले आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने अॅम्ब्युलन्सद्वारे
पुरी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले.”
मंदिर परिसरातील प्राथमिक आरोग्य
केंद्रातही उपचार सुरू असून, भाविकांना ग्लुकोज, पाणी आणि वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. “मी स्वतः
परिस्थितीवर लक्ष ठेवत असून रुग्णालयात जाऊन भेट देणार आहे,” असेही महालिंग यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षीही (2024) अशीच चेंगराचेंगरीची घटना घडली होती, ज्यात एका भाविकाचा मृत्यू झाला होता. यंदा प्रशासनाने कडक
उपाययोजना केल्या असल्या तरी गर्दीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने पुन्हा
मोठा गोंधळ झाला. सध्या रथयात्रा मार्गावर सुरक्षा
वाढवण्यात आली असून, भाविकांना संयम राखण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.