औरंगजेबाचे कौतुक भोवले; सपा आमदार अबू आझमी निलंबित

मुंबई : समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आज, बुधवारी विधीमंडळात त्यांच्यावर निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी अबू आझमी यांच्या विधानावरून विधीमंडळात मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी आमदारांनी कामकाज रोखून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. विरोधकांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या.

सत्ताधाऱ्यांची तीव्र मागणी: सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. औरंगजेबासारख्या क्रूर शासकाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न देशद्रोहासारखा गुन्हा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकरणावर अजूनही राजकीय वातावरण तापलेले असून, अबू आझमी यांच्या निलंबनानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत चर्चा सुरू आहे.