विकासकामांच्या निधीसाठी सोपलांना झुंजावे लागणार

बार्शी विधानसभेच्या निकालानंतर तापलेले राजकीय वातावरण शांत झाले आहे. सर्व सत्ताकेंद्रे ताब्यात असतानाही माजी आमदार राजेंद्र राऊत यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर अनुभवाच्या जोरावर माजीमंत्री दिलीप सोपल यांनी विजय मिळवला. राज्यात सत्ता महायुतीची आणि आमदार मात्र महाविकास आघाडीचा अशी अवस्था सध्या बार्शी तालुक्याची झाल्याने विकासकामांसाठी सोपल यांना संघर्ष करावा लागणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत बार्शीची निवडणूक चांगलीच गाजली.

वैराग

अण्णासाहेब कुरूलकर

पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या सोपल व राऊत यांच्यात आघाडी आणि महायुती अशी सरळ लढत झाली होती. या वेळच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी राऊत यांची साथ सोडत सोपल यांचा प्रचार केला. तर वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनीही सोपल यांना साथ दिली. त्यामुळे बार्शी आणि वैराग शहर या दोन्ही शहरातील मतदारांनी सोपल यांना आमदार करण्यात मदत केल्याचे दिसून आले. सोपल आमदार झाले असले तरी विकासकामांना निधी खेचून आणण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. बार्शी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाआघाडीकडून वैराग व भागातील मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. वैराग भागाच्या विकासासाठी दोन्ही पक्षांकडून आश्वासने देण्यात आली होती. त्यामुळे वैराग भागासाठी अस्मितेचा प्रश्न असलेला वैराग तालुका, उजनीचे पाणी, बंद संतनाथ साखर कारखाना सुरू करणे, तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसीची

उभारणी करणे, ग्रामीण रुग्णालय, नगरपंचायतीची प्रशस्त प्रशासकीय इमारत तयार करणे, वैराग कुडूवाडी, वैराग-मोहोळ, वैराग-तुळजापूरसह ग्रामीण भागातील रस्ते बांधणी करणे, सिंचनाच्या सोयी उभारणे, प्रशासनावर वचक ठेवत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळत विकासकामे मार्गी लावणे गरजेचे आहे. बार्शी नगरपालिकेची मुदत संपलेली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीबरोबरच गावो गावच्या निवडणुका आगामी काळात राऊत व सोपल यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असल्याने पुन्हा रणसंग्राम पाहायला मिळेल. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तोंडावर आहे. यातही दोघांचा कस लागणार आहे. वैराग भागाचे नेतृत्व करणारे धन्यकुमार भूमकर यांचे नातू व उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर हे फारकत घेत विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहेत. पण निवडणुकीनंतर भूमकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणात उलथापालत होण्याची शक्यता आहे. याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर, माजी सभापती मकरंद निंबाळकर, माजी सभापती अनिल डिसले, अरुण कापसे यांच्या भूमिका देखील वैराग भागातील राजकारणात महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण बार्शी तालुक्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष बदलला आहे. तर काही नाराज गटाने घेतलेल्या भूमिकांचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. राऊत यांच्या पक्षाचे राज्यात व केंद्रात सरकार आहे. त्यामुळे त्यांना पाठबळ मिळेल. तर सोपल यांना विरोधी पक्षात राहून काम करताना कार्यकर्त्यांना सांभाळत विकासकामे करावी लागणार आहे.