सिध्दरामेश्वरांच्या जीवनावर आधारित ड्रोन शो बाबत भक्तांची उत्सुकता आज आबालवृध्दांची होममैदानावर होणार गर्दी
सोलापूर- ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर यांच्या
यात्रेनिमित्त गुरूवार,15 रोजी होम मैदानावर प्रथमच होत असलेला
लेझर ड्रोन शो पाहण्यासाठी भक्तांची उत्सुकता वाढली आहे. गुरुवारी रात्री 8 ते 10 या वेळेत होणार्या या
लेझर ड्रोन शोमध्ये, सुमारे 300 ड्रोनच्या मदतीने शिवयोगी
श्री सिध्दरामेश्वर यांच्या चरित्रावर आधारीत भव्य देखावे आकाशाच्या पडद्यावर सादर
करण्यात येणार आहेत.राजधानी दिल्लीजवळील गुरूग्राम येथील एअरबोटिक्स टेक्नॉलॉजी ही
कंपनी ड्रोन लेझर शो सादर करणार आहे.
गेल्या पाच वर्षापासून श्री सिध्देश्वर देवस्थानच्यावतीने
शोभेच्या दारूकामाच्या दिवशी लेझर शो, टुडी आणि थ्रीडी लेझर
शो सारखे नव नवे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांना सिध्दरामेश्वर भक्तांकडून
मोठा प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या आराध्य दैवताचे
चरित्र प्रत्यक्ष पाहणे हा अफलातून अनुभव असल्याची भक्तांची भावना आहे. यंदा
होणार्या ड्रोनशोमध्ये शिवयोगी सिध्दरामेश्वरांचे चरित्र, त्यांनी
केलेले लोककल्याणाचे कार्य, त्यांची वचने आणि सोन्नलगी-
सोलापूरला भू कैलास बनवल्याची कथा सांगण्यात आली आहे. मल्लिकार्जुन आणि बालक
सिध्दरामेश्वर यांच्या श्रीशैल पर्वतावरील भेटीचा
‘कमरी कोळ्ळ’ नावाने प्रसिध्द असलेल्या प्रसंगाच्या थ्रीडी शोला मागील
वर्षी सिध्दरामेश्वर भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. ‘सोहळा गुरुभेटीचा’ या थ्रीडी
लेझर शोमध्ये मल्लिकार्जुन आणि सिध्दरामेश्वर या गुरु शिष्यांवर देवलोकातून
पुष्पवृष्टी होते. हा प्रसंग अतिशय प्रभावीपणे सादर करण्यात होता. या शोच्या आठवणी
भक्तांच्या मनात आजही ताज्या आहेत. या
शोच्या अखेरीस झालेल्या ‘करुनी कृपा मज न्यावे शिव धामा, जय
गुरु जय सिध्दरामा’ या आरतीत उपस्थित हजारो प्रेक्षकांनी आपल्या मोबाइलची बॅटरी
लावून आरतीत सहभाग घेतले होते. हे दृश्याचे अनेक व्हिडीओ समाज माध्यमावंर पाहिले
जात आहेत. या पार्श्वभूमिवर उद्या होणार्या ड्रोन लेझर शोबद्दल भक्तांच्या मनातील
उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.